ऐकावे जनांचे… शिवचरित्राचे अनोखे नाव निनादराव

>> अक्षय मोटेगावकर, [email protected]

शिवचरित्र आणि महाराजांचे संस्कार, स्वराज्याची संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात निनाद बेडेकर यांच्यासाख्या इतिहास संशोधकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यानमाला आवर्जून ऐकावी अशी आहे.

जगाच्या काना-कोपऱयातील मराठी माणूस कसा ओळखायचा याची एक सोपी चाचणी म्हणजे- `छत्रपती शिवाजी महाराज की…’ असं म्हटलं की ज्याच्या तोंडून आपसूकपणे `जय’ असं निघतं तो मराठी माणूस. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर, परामांवर, युद्धनीतीवर, व्यवस्थापन पद्धतीवर, माणूस जोडण्याच्या कलेवर, स्वाभिमान जागृतीच्या कौशल्यावर, ध्येय धोरणांवर आजपावेतो हजारो पुस्तके, प्रकरणे लिहिली गेली असतील, भाषणे दिली गेली असतील, पण अजूनही जसं जसं शिवाजी महाराजांचा अभ्यास केला जातो तसे तसे त्यांचे वेगवेगळे पैलू उजेडात येतात आणि अजून अजून लिहिले जाते, बोलले जाते.

बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित `जाणता राजा’ हे महानाटय़ पाहिल्यावर शिवरायांची महती याची देही याची डोळा अनुभवल्याची अनुभूती मिळाली होती. पुण्यात एकदा नितीन बानगुडे पाटील यांना पण ऐकण्याचा योग आला होता. या औत्सुक्याच्या नात्याला फार मोठय़ा प्रमाणात उजाळी मिळाली जेव्हा निनादराव बेडेकरांना ऐकायला सुरुवात केली. मूळचे इंजिनीअर असलेल्या निनादरावांनी `कमिन्स’सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर काम करत असताना शिवचरित्राचा ध्यास घेतला आणि तोच ध्यास ते शेवटपर्यंत जगले. निनाद बेडेकरांची एक सात दिवसांची व्याख्यानमाला यूटय़ुबवर उपलब्ध आहे. ती आणि त्यांची इतर काही व्याख्याने, मुलाखती, कार्पाम ऐकायला मिळाले आणि जाणवले की इतके दिवस आपण जे पहिले, वाचले, ऐकले त्यापेक्षा अजून कितीतरी मोठे आणि महान आहेत आपले शिवाजी महाराज. त्यांच्या व्यक्तिमत्वाला असंख्य पैलू आणि आयाम आहेत. शिवरायांचे चरित्र कितीही वर्णन केले तरी काकणभर उरणारेच.

अशा या शिवरायांबद्दलच्या मूळ लेखनाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून निनादरावांनी मोडी, उर्दू, फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी, हिंदी या लिपी आणि भाषांवर प्रभुत्व मिळवले. अखंड भटकंती करून अस्सल पत्रे, दस्तावेज, बखरी, कागदपत्रे मिळवली. तिचा पुराव्यांनुसार, सनावळींनुसार  नीरक्षीर विवेकाने अभ्यास केला. जाणकारांकडून मतांची, अभ्यासाची पुष्टी करून घेतली आणि त्यानुसार एक साक्षेपी मांडणी केली आणि आपल्या भाषणांतून शिव चरित्राचा सप्रमाण प्रसार आणि प्रचार केला. बखरीतील अनेक तथ्यहीन भाकडकथांचा समाचार घेतला. मदारी मेहतर यासारख्या काल्पनिक पात्रांचे अस्तित्व नाकारले, महाराजांच्या सैन्यातील मुस्लिमांबद्दल आणि त्यांच्या वादग्रस्त संख्येबद्दल परखड भाष्य केले. निनादराव या साध्या मताचे होते की, महापुरुष हे महापुरुषच असतात. त्यांना अकारण दंतकथा चिकटवण्याचे कारण नाहीये आणि शिवाजी महाराजांचे चरित्र हे मुळातच धाडसाने, मुत्सद्देगिरीने भरलेले आहे. त्यात अजून काही खोटीनाटी भर घालायची गरज नाही.

आपण महाराजांचा अश्वारूढ, तलवार घेतलेला पुतळा कित्येक गावांमध्ये पाहतो, पण फार कमी जणांना ही माहिती असते की शिवाजी महाराज हे एक उत्कृष्ट धनुर्धर होते. त्यांनी कित्येक लढाया या धनुर्विद्येवर जिंकल्या. महाराजांचा गनिमी कावा खूप जण ऐकून आहेत, पण त्यांनी महाबळेश्वर आणि मंचरमध्ये अपामे जंगलात आणि मैदानावर खेळलेली युद्धेसुद्धा गाजवली. शिवाजी महाराज आपले आहेत म्हणून आपण त्यांचा गौरव करणे ही बाब समजू शकतो, पण महाराजांचे जे समकालीन जागतिक प्रवासी होते, हेर होते, विविध देशांचे प्रतिनिधी आणि अभ्यासक होते त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे ते निनादरावांच्या तोंडून ऐकले की जाणवते की शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाच्या आदराचा, कुतूहलाचा आणि प्रेरणेचा विषय नव्हते, तर ते जागतिक स्तरावर दखल घेतलेले अत्यंत महापरामी राजे होते. शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले आणि किती किल्ले स्वतच्या काळात बांधले, मद्रास (चेन्नई), तंजावरपर्यंत कसा स्वराज्य विस्तार केला, घरभेदींना, गुन्हेगारांना कसे हाताळले, शिवाजी महाराज हे स्वधर्म स्थापनेसाठीच कसे आयुष्यभर लढले हे आणि असे खूप काही एका वेगळ्याच नजरेतून पाहायला, शिकायला मिळते निनादरावांना ऐकले की. असे हे निनादराव 10 मे 2015 ला शिव चरणांशी लीन झाले आणि आपल्यासाठी एक मोठा ठेवा सोडून गेले.

(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)