‘घड्याळा’चा उद्या फैसला, अजितदादांना धाकधूक

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्हाचा अंतिम फैसला होईपर्यंत अजित पवार गटाला दिलेले ‘घड्याळ’ चिन्ह गोठवून नवीन चिन्ह वापरण्याचे निर्देश द्या, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला केली. न्यायालय याबाबत गुरुवारी निर्णय देणार आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव व चिन्हाचे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर करताना अजित पवार गटाला काही निर्देश दिले होते. ‘घड्याळ’ चिन्हाच्या खाली ‘सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून’ असा उल्लेख करण्याचे अंतरिम आदेश आहेत. अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीत अंतरिम आदेशाचे पालन केले नाही. मतदारांमध्ये चिन्हाबाबत संभ्रम निर्माण करून मते मिळवली. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होऊ शकते, असा युक्तिवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आला.

विधानसभेसाठी अजित पवार गटाला नवीन चिन्ह?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घेऊन अजित पवार गटाला ‘घड्याळ’ चिन्हाचा निवडणुकीत वापर करण्यावर निर्बंध घाला, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वकिलांनी केली. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने 24 ऑक्टोबरला ‘घड्याळा’बाबत निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवार गटाला ‘घड्याळा’ऐवजी दुसऱ्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.