निवडणूक आयोगाने लोकशाहीचा गळा घोटला होऽऽऽ; शिंदे गटाने गळा काढला, अंबरनाथमधील निवडणूक पुढे ढकलल्याने भाजपविरोधात थयथयाट

2 डिसेंबर रोजी होणारी अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने संतापलेल्या शिंदे गटाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसून थयथयाट केला. मतदान पुढे ढकलून निवडणूक आयोगाने लोकशाहीचा गळा घोटला आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली खोटी कारणे पुढे करून तुम्ही निवडणूक पुढे का ढकलली, असा सवाल करत शिंदे गटाच्या उमेदवारांनी थेट भाजपला टार्गेट केले.

अंबरनाथमधील मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार मतदार असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वी केला होता. ही नावे यादीतून तत्काळ वगळा असा दमच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर लगेचच अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूकच २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. ही निवडणूक पुढे ढकलण्यामागे सत्ताधारी पक्ष असल्याचा आरोप करत शिंदे गटाचे उमेदवार आज थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसले. निवडणूक आयोग हाय हाय… सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहात काय, अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. ही निवडणूक राजकीय दबावाखाली जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात आली आहे. ज्या उमेदवाराने आक्षेप घेतला ती आता निवडणुकीच्या रिंगणातच नाही. मग तुम्ही खोटी कारणे पुढे करून निवडणूक पुढे ढकलताय काय, अशी बोंब शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठोकली.

काय घडले?
अंबरनाथमध्ये भाजप अणि शिंदे गट परस्परांविरोधात उभे ठाकले आहे. शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर भाजप आक्षेप घेणार असल्याची कुणकुण लागताच वाळेकर यांच्या वहिनी साधना वाळेकर यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस मिळाले नाहीत असे सांगत कोर्टात धाव घेतली होती, परंतु साधना वाळेकर यांनी आपला अर्जही त्याचदरम्यान मागे घेतला. त्यामुळे अंबरनाथ नगराध्यक्षपदावरून कायदेशीर लढाईत न्यायालयाचा निकाल विलंबाने लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने अंबरनाथसह सात नगर परिषदांची निवडणूकच स्थगित करून ती २० डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले.