670 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार; ठाणे, पालघर, रायगडात कडेकोट बंदोबस्त

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील १४ नगरपालिका आणि १ नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे, तर बुधवारी लगेचच मतमोजणी होणार आहे. सोमवारी रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. आता तिन्ही जिल्हयातील ६७० उमेदवारांचा फैसला होणार आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून सर्व केंद्रांवर ईव्हीएम मशीनसह निवडणुकीचे सर्व साहित्य पोहोच झाले असून सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही कडेकोट ठेवला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, पालघर नगर परिषद आणि वाडा नगरपंचायत, शिवाय रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, कर्जत, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण नगर परिषदेसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, अंबरनाथ पालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे, तर बदलापूर पालि केच्या सहा वॉर्डातील आणि पालघर पालिकेच्या एका जागेची निवडणूकही पुढे ढकलली असून या दोन्ही ठिकाणी २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

असा असेल फौजफाटा
मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक पालिका निवडणुकीसाठी पोलीस अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, पोलीस कर्मचारी आणि होम गार्ड्स असा फौजफाटा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारी मतदार यंत्रे व अन्य साहित्याचे वाटप सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांच्या प्रचारासाठी रविवारी शहरातून भव्य रॅली निघाली. यावेळी संपर्कप्रमुख बाळ राऊळ, माजी संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, तालुकाप्रमुख आशीष फळसकर, उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे, मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे, सुभाष मोरे, अॅड. मानसी वाघमारे, उमेश तांबे आदी उपस्थित होते.

बुधवारी मतमोजणी; दोन तासात निकाल
मंगळवारी मतदान झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बुधवारी मतमोजणी होणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणी सकाळी १० वाजता सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात मतमोजणी होणार असून दोन तासात सर्वच निकाल जाहीर होतील अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने दिली आहे.
निवडणुकीच्या प्रचाराची मुदत सोमवारी रात्री १० वाजता संपताच सर्वच राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार थांबला. जागोजागी लागलेले उमेदवारांच्या प्रचाराचे फलकही उतरवण्यात आले.

वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांसाठी सोमवारी सायंकाळी ५ वाजता भव्य प्रचार रॅली काढली. या रॅलीत शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, कृष्णकांत कोंडलेकर, सोन्या पाटील, निलेश गंधे, प्रकाश किणी, गोविंद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने उमेदवार व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक वार्डातून निघालेल्या या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण केले.