साहित्यिक, साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ऐतिहासिक सातारानगरी सज्ज

<< गजानन चेणगे >>

ऐतिहासिक सातारानगरीत होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर साताऱ्यात साहित्यिकांचा आनंदमेळा जमणार असल्याने सातारकरही हा साहित्याचा भव्यदिव्य सोहळा अनुभवण्यासाठी आतुर झाले आहेत.

साताऱ्यातील हे शतकपूर्व साहित्य संमेलन नवनवीन संकल्पना घेऊन पुढे येत आहे. संमेलन सर्वोत्तम व्हावे यासाठी आयोजकांसह साताऱ्यातील प्रत्येक नागरिक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. साताऱ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीचे सुग्रास भोजन साहित्यिकांचे रसनारंजन करणार आहे. विशेष निमंत्रित साहित्यिकांची खास बडदास्त ठेवण्यात येणार असून, त्यांना चांदीच्या ताटात भोजन देऊन मराठ्यांच्या राजधानीत प्रेमाने कौतुक केले जाणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशनतर्फे नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून, दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम येथे ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दिमाखदार ग्रंथदिंडीने गुरुवारी (दि. १) संमेलनास प्रारंभ होणार आहे.

जिल्ह्याच्या हद्दीपासून स्वागतफलक

साहित्य संमेलनानिमित्त ऐतिहासिक सातारानगरीकडे येणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीपासून महामार्गावर भव्य फलक उभारण्यात आले आहेत. हे फलक महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेतर्फे शहराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर जागोजागी ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे, मावळा फाउंडेशनचे तसेच संमेलन संरक्षक संस्थांचे बोधचिन्ह लावण्यात आले आहेत. संमेलनाचे नाव व बोधचिन्ह दर्शविणारा आकाशफुगा दिमाखाने आकाशात विहरत असून तो सातारकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

९९वे साहित्य संमेलन शहराच्या मध्यवर्ती भागातील १४ एकर क्षेत्रफळाच्या छत्रपती शाहू स्टेडियम येथे होत आहे. याच स्टेडियमवर १९९३ मध्ये ६६वे साहित्य संमेलन दिमाखात साजरे झाले होते, हा एक सुखद योगायोग आहे. येथे मुख्य मंडपासह ग्रंथप्रदर्शन, कवी–गझल कट्टा यांसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्याची ओळख सांगणाऱ्या उपक्रमांची रेलचेल

या उत्सवात सातारा जिल्ह्याची ओळख दर्शविणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत मराठी भाषा, मराठी बाणा, भाषेचा संघर्ष, मराठ्यांची राजधानी तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविले जाणार आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे प्रतिबिंब दर्शविणारे ‘हे शतकपूर्व संमेलन साताऱ्यातील’ हे संमेलनगीत तयार करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ५५ शाळा व महाविद्यालयांसह शिक्षण विभागामार्फत प्रत्येक तालुक्याचा एक याप्रमाणे ११ चित्ररथ आणि जिल्हा परिषदेचा एक स्वतंत्र चित्ररथ सादर होणार आहे. संमेलनाच्या अनुषंगाने ‘सातारा आणि अटकेपार’ या साम्राज्याच्या विस्ताराची व पराक्रमाची आठवण करून देणारी ‘अटकेपार’ ही स्मरणिका तयार करण्यात आली आहे. हे संमेलन सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.

संमेलनाच्या मुख्य मंडपात जाणारा रस्ता ग्रंथदालनातूनच

संमेलनस्थळ सातारा बसस्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असल्याने बाहेरून येणाऱ्या साहित्यरसिकांना ते सहज उपलब्ध होणार आहे.

साहित्य नगरीच्या ठळक नोंदी

  • मुख्य मंडपाची आसनक्षमता सुमारे १० हजार

  • मुख्य मंडपासह ग्रंथप्रदर्शन व कवी–गझल कट्ट्यासाठी स्वतंत्र मंडप

  • ग्रंथप्रदर्शनासाठी ९×९ फूट आकाराचे जर्मन हँगरचे २५४ गाळे

  • शंभरहून अधिक स्वच्छतागृहे; दर तासाला साफसफाई

  • विद्युत पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून महावितरणचे कर्मचारी तैनात

  • अग्निशमन दलाचे तीन बंब २४ तास उपस्थित

  • वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था

  • आरोग्य सेवेसाठी जिल्हा रुग्णालयाचे पथक व दोन रुग्णवाहिका तैनात

मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारानगरीत साहित्यिक व साहित्यप्रेमींचे स्वागताध्यक्ष या नात्याने मी मनःपूर्वक स्वागत करतो. या संमेलनाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले असून, साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे संमेलन होईल, असा विश्वास आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्वागताध्यक्ष

दरवर्षी होणाऱ्या संमेलनांपेक्षा यंदाचे संमेलन कार्यक्रमांच्या वैविध्यामुळे अनोखे ठरणार असून, साताऱ्यातील हे शतकपूर्व संमेलन गुणवत्तेची नवी उंची गाठेल.
प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला शतकपूर्व संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाल्याने सातारा जिल्ह्याची ओळख अधोरेखित करणारे, वैशिष्ट्यपूर्ण व लक्षवेधी संमेलन घडविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.
विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष