माणगावात महायुती सरकारची तिरडी उचलली; महामार्गाचे काम रखडले, बायपासची दुर्दशा

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि बायपासची झालेली दुर्दशा याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माणगावात आज महायुती सरकारची तिरडी उचलून अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनात सहभागी झालेल्या स्थानिक रहिवाशांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे तिरडी आंदोलन जनआक्रोश समितीच्या माध्यमातून छेडण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अनेक वर्षे झाली असून वारंवार मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे लोणेरे, नवघर, उसरघर, वडपाले, टेमपाले या गावातील स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. पहेल आणि खांडपाले या गावांना महामार्गावर येण्यासाठी असणाऱ्या बायपासचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पहेल आणि खांडपाले गावातून महामार्गावर जाण्यासाठी चारही बाजूने रस्ता ठेवणे आवश्यक आहे, परंतु एकाच बाजूने रस्ता ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडताना मोटारसायकल, रिक्षा तसेच शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनात विशाल टेंबे, प्रभाकर ढेपे, संतोष शिंदे, शिवाजी टेंबे, हरीभाऊ शिंदे, राहुल बरे, ज्ञानेश्वर शिगवण, घाडगे सर, मंगेश वाघोस्कर, महेश खराडे, संजय वाघोस्कर, रामदास खराडे, सुनील खराडे, नारायण केसरकर, मुकेश शिंदे यांच्यासह शेकडो रहिवासी सहभागी झाले होते.