
उत्तर प्रदेशातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) कानपूर येथे विद्यार्थ्यांच्या झोपेच्या समस्येवर एक आगळावेगळा अभ्यास सुरू करण्यात आला. वर्गात लेक्चर सुरू असताना काही विद्यार्थी वारंवार झोपताना दिसत होते. प्राध्यापकांनी यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी संशोधन हाती घेत या झोपेमागील कोडे उलगडले आहे.
आयआयटीमध्ये वर्गात झोपलेले विद्यार्थी हे वसतिगृहातील असल्याचे समोर आले आहे. या संशोधनांतर्गत विद्यार्थ्यांना रात्री झोपताना वसतिगृहातील वातावरण किती आरामदायी आहे, याचा सखोल अभ्यास करण्यात आला. अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, वसतिगृहाची रचना आणि एकूणच तिथले वातावरण हे विद्यार्थ्यांच्या झोपेसाठी फारसे पूरक नव्हते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये नीट झोप लागत नव्हती. रात्री व्यवस्थित झोप न झाल्याने हे विद्यार्थी लेक्चर सुरू असताना झोपत असल्याचे या अभ्यासातून उघडकीस आले आहे. संशोधन करणारे पथक वसतिगृहातील हवा, तापमान आणि रूममधील इतर परिस्थितीचादेखील अभ्यास करत आहेत. वसतीगृहातील खोलीत हवा खेळती नसल्याने, तसेच रूममधील वातावरण तितकेसे पूरक नसल्याने हे सर्व घडत आहे. झोपेचे वातावरण विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि अभ्यासक्षमतेवर महत्त्वाची भूमिका बजावते हे सिद्ध करण्यासाठी आम्ही पुरेसा डेटा गोळा करत आहोत. विद्यार्थ्यांच्या झोपेचा आणि वसतिगृहातील खोलीचा संबंध स्पष्ट झाला तर भविष्यात वसतिगृहे आणि निवासी इमारतींची रचना अधिक चांगली करता येईल, असे प्रकल्पाशी संबंधित डॉ. अनुभा गोयल यांनी सांगितले.



























































