
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) कडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून होणार आहे. नव्या नियमानुसार, क्रेडिट कार्डचे बील हे आरबीआयच्या बीबीपीएस या प्रणालीच्या माध्यमातून भरावे लागणार आहे. त्यामुळे या नव्या नियमांचा परिणाम फोन पे, क्रेड, बिलडेस्क, इन्फिबिन यांसारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून सर्व क्रेडिट कार्डचे पेमेंट फक्त भारत बिल पेमेंट सिस्टिम (बीबीपीएस)च्या माध्यमातूनच दिले जावेत, अशी सूचना याआधीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली होती.
एचडीएफसी बँकेने आतापर्यंत दोन कोटी क्रेडिट कार्ड जारी केलेले आहेत. आयसीआयसीआय बँकेने 1.7 कोटी क्रेडिट कार्ड जारी केलेले आहेत. ऑक्सिस बँकेचे एकूण 1.4 कोटी क्रेडिट कार्ड आहेत. या सर्व बँकांनी आतापर्यंत बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. बँकांनीच ही प्रणाली सक्रिय न केल्यामुळे 30 जूननंतर या मंचावरून क्रेडिट कार्डचे बिल भरताना अडचणी वाढू शकतात.
तीन महिन्यांचा वेळ द्या
1 जुलैपासून लागू होणारा नवा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देशभरात एकूण 34 बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. परंतु आतापर्यंत यातील केवळ 8 बँकांनी बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे. त्यामुळे वेळ वाढवून देणे गरजेचे आहे, असे बँकांनी म्हटले आहे.
काय अडचण येईल?
ऑक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. या बँकांनी आतापर्यंत पाच कोटींपेक्षा अधिक व्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना दिलेली आहेत. त्यामुळे फोन पे, क्रेड, तसेच अन्य अॅपवरून या बँकांच्या व्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या अॅपच्या मदतीने क्रेडिट कार्डचे बील भरता येणार नाही.