मिहीर शहासह त्याचे मित्र प्यायले व्हिस्कीचे 12 लार्ज पेग; पोलिसांनी आरोपींसोबत केले सीन रिक्रएशन

वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने धक्कादायक माहिती दिली आहे. घटनेच्या आधी मिहीर शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी व्हिस्कीचे एक-दोन नव्हे तर तब्बल 12 लार्ज पेग प्यायले होते. बारमध्ये दारूच्या पार्टीच्या बिलाच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती उघड केली आहे. मिहीर आणि त्याच्या मित्रांनी प्रत्येकी चार लार्ज पेग घेतल्याचे स्पष्ट होत आहे. चार लार्ज पेग व्हिस्की प्यायल्यास आठ तासांपर्यंत नशा होऊ शकते, असे उत्पादन शुल्क विभागाचे मत आहे. त्यामुळे वरळीत ‘हिट अँड रन’ घडले, त्यावेळी मिहीर दारूच्याच नशेत असल्याचा संशय आणखी बळावला आहे.

अहवालात म्हटल्याप्रमाणे मिहीर शहा आणि त्याचे मित्र रविवारी पहाटे 1:30 वाजता मद्यपान करून बारमधून बाहेर पडले. त्यानंतर चार तासांच्या आत पहाटे 5 च्या सुमारास हा अपघात झाला. 25 वर्षांखालील मिहीरला अल्कोहोल देणाऱ्या जुहू बारचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने रद्द केला आहे. मिहीर शहा जुहूतील ज्या बारमध्ये दारू प्यायला होता त्या व्हाइस-ग्लोबल तापस बारवर बुधवारी महापालिकेने कारवाई केली. तेथील कथित अनधिकृत बांधकाम तोडले.

दरम्यान, मिहीर शहाने पबमध्ये त्याचे वय वर्षे 27 दर्शविणारे कथित ओळखपत्र वापरल्याची माहिती मिळते. अधिकृत नोंदीनुसार मिहीर शहा 23 वर्षांचा आहे. तर कायदेशीर मद्यपानाचे किमान वय 25 वर्षे आहे. तर मिहीरसोबत पबमध्ये गेलेल्या त्याच्या तीन मित्रांचे वय 30 पेक्षा जास्त आहे, असेही पुढे नमूद केले.

आरोपीला घेऊन पोलिसांचे सीन रिक्रिएशन

आरोपी मिहीर शहा याला घेऊन मुंबई पोलीस गुरुवारी घटनास्थळी गेले. वरळीतील सीजे हाऊस ते सी लिंकपर्यंत बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणाचा सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिदावत यांची आमने-सामने चौकशी केली. यावेळी दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अपघातावेळी आपण गाडी चालवत असल्याचे मिहीरने कबूल केले. कारच्या टायरमध्ये महिला अडकल्याची माहिती असतानाही तो थांबला नाही.

घटनेनंतर शहाने आपली कार आणि ड्रायव्हरला तिथेच टाकून तात्काळ रिक्षात बसून पळ काढला. त्यानंतर तो रिक्षाने गर्लफ्रेंडच्या घरी गोरेगावला गेला. तिथून बहिणीसोबत बोरिवलीला मग शहापूरमधील रिसॉर्टमध्ये पळून गेला. मात्र अखेर मंगळवारी विरार येथून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.