मुलुंडमधील एलबीएस, ईस्टर्न एक्प्रेस हायवेचे रस्ते होणार काँक्रीटचे, कांदिवलीतील रस्त्यांसाठी 48 कोटी

मुलुंडमधील राजा इंडस्ट्रीयल इस्टेट ते एलबीएस रोड ईस्टर्न एक्प्रेस हायवेदरम्यान डीपी रोडचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल 24 कोटी 53 लाख 73 हजार रुपये खर्च करणार आहे. मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन आराखड्यात अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे.

राजा इंडस्ट्रीयल इस्टेट ते लालबहादूर शास्त्री मार्गावरील 18.30 मीटरचा रस्ता, 13.40 किलोमीटर लांब गाला इंडस्ट्रीयल इस्टेट रोड आणि ईस्टर्न एक्प्रेस हायवे ते टाटा कॉलनीचा 18.30 किलोमीटर लांब रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेत पात्र कंत्राटदाराला पावसाळा वगळून 18 महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. मुंबई महापालिकेच्या डीआय 2034 नुसार डीपी रोडची सुधारणा करण्यात येत असल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले.

कांदिवलीतील रस्त्यांसाठी 48 कोटी

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट-काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. कांदिवली पश्चिमेकडील 6 मीटर रुंदीपर्यंतचे लहान सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांच्या पॅसेजमधील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदाराला पावसाळा वगळून 12 महिन्यांत हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. या कामासाठी मुंबई महापालिका 48 कोटी 49 लाख 36 हजार 658 रुपये खर्च करण्यात येणार आहे.