
पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढविण्यासाठी धावपट्टी विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी 35 एकर जागा आवश्यक असून, ती जागा लवकरात भूसंपादन करण्यात येईल. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱया सीआयएफएस जवानांची 321 जणांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरात लवकर नवीन विमानतळ सुरू करण्यात येईल, असे पेंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचे चार महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आले. परंतु, विमानतळ अद्याप सुरू झाले नाही. सध्या जुन्या विमानतळावरून प्रवासीसेवा सुरू आहे. रविवारी पेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी करून आढावा घेतला. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य 60 टक्के खर्च देणार…
धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी हवाई दल आणि खासगी जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 160 कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे. यामध्ये राज्य सरकार 60 टक्के, पुणे महापालिका 20 टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए 10 टक्के खर्च देणार आहे.