
शिवसेना भवन येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या महायुतीचा संयुक्त वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये आले आहेत, दोन भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नवचैतन्याची लहर निर्माण झाली आहे. शिवशक्तीचा वचननामा जनतेसमोर सादर करत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. त्यांनी पुढे म्हटले की ही सत्ता झुंडशाही आहे, याला लोकशाही म्हणता येणार नाही. आम्ही त्यांच्या मतचोरीचा पर्दाफाश केला असून आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते महाराष्ट्राला यापूर्वी लाभले नव्हते, असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील बिनविरोध निवडणुका ही लोकशाहीचा अपमान असल्याचे म्हटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी सांगितले की, नार्वेकर हे अधिकाराचा दुरुपयोग करून दमदाटी करत आहेत, स्वतः संरक्षणात राहून इतरांचे संरक्षण काढून घेत आहेत. अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नसतात, ते संपूर्ण विधिमंडळाचे असतात आणि निःपक्षपाती भूमिका अपेक्षित असते. अध्यक्ष प्रचाराला जाऊ शकत नाहीत, तरी त्यांनी उद्दाम वर्तन केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणुकीत दमदाटी करून बिनविरोध निवडणुका लावल्या जात आहेत, निकाल राखून ठेवला जात आहे आणि शेवटी ते सत्ताधाऱ्यांच्याच वळचणीला जाणार आहेत. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले असून जेन-झी मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला आहे. जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुका घेतल्या पाहिजेत, अन्यथा निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम आहे असा समज निर्माण होईल, असे ते म्हणाले.
वरळीतील सभेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, डोममध्ये बरेच “डोमकावळे” जमा झाले होते. जे लोक म्हणतात की मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असावा, त्यांच्यातील अनेक जण शिवसेनेतून गेलेले गद्दार आहेत. त्यांच्या धर्माची विचारणा त्यांनी करावी. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आतापर्यंतही शिवसेनेनेच मराठी महापौर दिले आहेत. भाजप जेव्हा आमच्यासोबत होता तेव्हा उपमहापौर कोणाचा केला हे त्यांनी स्वतःला विचारावे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली 25 वर्षे आम्ही कोस्टल रोड, मध्य वैतरणा प्रकल्प, कोरोना काळातील वैद्यकीय कामे अशी साधी कामे केली. पण त्यांनी ज्या प्रकारे खोट्या दाव्यांनी स्वतःचे श्रेय सांगितले आहे त्यानुसार मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आणि अरबी समुद्र मिंध्यांनी निर्माण केला असेच म्हणावे लागेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचेही श्रेय हेच लोक घेत आहेत. शिवस्मारकाचे जलपूजन झाले पण स्मारक अजून पाण्याखाली आहे, ते बाहेर कधी काढणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोस्टल रोड आणि मध्य वैतरणा प्रकल्पांचे काम फडणवीस किंवा शिंदे ओळखले जात नव्हते तेव्हाच सुरू झाले होते, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई महापालिकेच्या ठेवींवर बोलताना त्यांनी सांगितले की महापालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवींपैकी 45 हजार कोटी रुपये कामगारांच्या हक्कांसाठी राखीव होते. उरलेला पैसा दीर्घकालीन प्रकल्पांसाठी होता. आज 15 हजार कोटींचे वार्षिक बजेट असताना एक लाख कोटींचे देणं कंत्राटदारांना करण्यात आले आहे. हा लाखो कोटींचा घोटाळा आहे आणि तीन लाख कोटींच्या घोटाळ्याची माहिती आपल्या हाती आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अडवांस मोबिलायझेशनमधून किकबॅक घेऊन हा पैसा निवडणुकांसाठी वापरला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ठेवी या काय चाटायला नसतात हे अशोभनीय विधान आहे. मला त्यांना सांगायचं तुमच अगदी 100 टक्के बरोबर आहे ठेवी या चाटायला नसतात. पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायलाही नसतात
मराठी माणसाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? आम्ही अस्सल मराठी आणि हिंदू आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ किंवा भाजप कुठे होते, असा सवाल त्यांनी केला. मुंबई महापालिका अदानीस्तान होईल, असा थेट आरोप करत त्यांनी म्हटले की अनेक प्रकल्प बिल्डर आणि उद्योगसमूहांच्या घशात घातले जात आहेत. आर्थिक केंद्र अहमदाबादला नेण्यात आले आणि मुंबईकरांना रोजगाराच्या संधींपासून वंचित करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.
पाणी प्रकल्पांवर बोलताना त्यांनी गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल करावी लागणार होती, म्हणून तो थांबवला, असे सांगितले. त्याऐवजी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करून पिण्यायोग्य करण्याचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता, 400 एमएलडी क्षमतेचा पायलट प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला असता, पण हा प्रकल्प थांबवण्यात आला आणि परत धरणांवर भर देण्यात आला. हे सर्व कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललेली लूट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोरोना काळातील कामांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, आमचे काम आम्ही सांगणारच. मुंबई मॉडेलचे जगभर कौतुक झाले, WHO पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रशंसा झाली. उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, त्या काळात आम्ही मुंबई वाचवली. या कामांची पुस्तिका आम्ही वाटणारच, निवडणूक आयोगाला आवडो वा न आवडो, असेही ते म्हणाले.
देशावर हिंदू नेता राज्य करतोय तरही रोहिंग्या आणि बांगलादेशी कसे घुसतात? हे अपयश कुणाचे? मराठी माणसाचा अपमान, घर नाकारणे, खाण्यावरून भेदभाव – हे सगळे गेल्या दोन वर्षांत वाढले आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठी सक्तीचे आदेश रद्द करण्यात आले, मराठी भाषा भवन थांबवले, रंगभूमी दालन, डेअरी प्रकल्प रद्द करून बिल्डरना दिले, असे आरोपही त्यांनी केले.


























































