
राज्यात गेल्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राज्यातील धरणांमध्ये 49.73 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत तो 42 टक्के होता. मात्र, उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, जलसाठा झपाटय़ाने कमी होत आहे. जिह्यात 10 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीत पाणीसाठय़ात 10 टक्क्यांची घट झाली आहे.
जिह्यातील भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरण या प्रमुख प्रकल्पांमध्ये 10 मार्चला 66.72 टक्के पाणीसाठा होता. तो 10 एप्रिलपर्यंत घसरून 56 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये सुमारे 49 टक्के पाणीसाठा होता.
सध्या भंडारदरा धरणात 6,276 दशलक्ष घनफूट (56.85 टक्के), मुळा धरणात 14,743 दशलक्ष घनफूट (56.70 टक्के), तर निळवंडे धरणात 5,517 दशलक्ष घनफूट (66.31 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. जिह्यातील सहा मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठय़ात मोठी घट झाली आहे. 10 मार्चला 62.11 टक्के असलेला साठा 10 एप्रिलला 44.70 टक्क्यांवर आला आहे.
प्रकल्पनिहाय पाणीसाठा टक्के (10 एप्रिलपर्यंत)
भंडारदरा ः 56.85 टक्के
मुळा ः 56.70
निळवंडे ः 66.31
आढळा ः 66.32
मांडओहळ ः 22.61
घाटशिळ ः 43.48,
सीना ः 59.71
खैरी ः 48.80
विसापूर ः 33.29 टक्के.
जिह्यात 40 टँकरने पाणीपुरवठा
अहिल्यानगर ः जिह्यातील मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने सर्वच तलाव भरले होते. मार्च महिन्यापासून डोंगराळ आणि पठारी भागाला पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. सध्या जिह्यातील 14 गावे आणि 47 वाडय़ा-वस्त्यांना 40 टँकरने 30 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 10 गावे आणि 21 वाडय़ा-वस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.


























































