
आधीच जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत कसोटी संघाच्या कामगिरीनुसार दोन गट पाडण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी समोर आला होता. मात्र आता कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या 12 संघांना डब्ल्यूटीसीमध्ये सामावून घेण्याचा मोठा बदल आयसीसीच्या बैठकीत सुचविण्यात आला आहे. त्यामुळे कसोटी दर्जा असलेल्या छोटय़ा संघांनाही दिग्गज संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव प्राप्त होईल. हा बदल 2027-29 चक्रात करावा अशी शिफारसही करण्यात आली आहे. तसेच बंद पडलेली एकदिवसीय सुपर लीग पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कसोटी संघांची संख्या वाढवल्यामुळे डब्ल्यूटीसीचा रोमांच आणखी कमी होईल आणि एकतर्फी आणि पंटाळवाण्या लढतींची संख्या वाढेल, अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे.
न्यूझीलंडचे माजी फलंदाज रॉजर टूज यांच्या नेतृत्वाखालील समितीने मागील आठवडय़ात दुबई येथे झालेल्या आयसीसीच्या तिमाही बैठकीदरम्यान या शिफारशी सादर केल्या. या समितीला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ांवर सखोल विचार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार या समितीने अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड या तीन कसोटी संघांनाही पुढील चक्रात कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सामील करण्यात यावे. सध्या ही स्पर्धा फक्त नऊ देशांपुरती मर्यादित आहे. या प्रस्तावावर चर्चा करताना काही देशांनी द्विस्तरीय प्रणालीचा विरोध केला. श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान या देशांनी असा दावा केला की मोठय़ा संघांविरुद्ध सामने न झाल्यास त्यांच्या क्रिकेट बोर्डांना आर्थिक फटका बसेल.
आयसीसीच्या एका संचालकाने स्पष्ट केले, या शिफारशीमुळे प्रत्येक देशाला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. जे संघ या स्वरूपात खेळण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हा प्रोत्साहनात्मक बदल ठरेल. याशिवाय, 2023 मध्ये स्थगित झालेल्या एकदिवसीय सुपर लीगलाही पुन्हा सुरू करण्याची शिफारस झाली आहे. ही 13 संघांची लीग जुलै 2020 मध्ये सुरू झाली होती. प्रस्तावात 2028 पासून सुरू होणाऱया नव्या लीगमध्ये किती संघ सहभागी होतील, हे स्पष्ट केलेले नाही, मात्र 50 षटकांच्या विश्वचषकात संघसंख्या 14 इतकी वाढवण्याचा विचार आहे. त्यामुळे 2027 चा विश्वचषक 14 संघांचा सहभाग असेल. मागील दोन्ही वर्ल्ड कपमध्ये फक्त 10 संघ होते. दरम्यान, टी-20 विश्वचषकात 20 संघ कायम ठेवण्याचे ठरले असून भविष्यात ते टप्प्याटप्प्याने 32 संघांपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे.



























































