
रुळावर शेकोटी पेटवून मेल-एक्स्प्रेसमध्ये लूट करण्याचा डाव रेल्वे पोलिसांनी उधळून लावला आहे. यावेळी चोरट्यांनी गस्त घालण्यासाठी गेलेल्या पोलिसावर चाकूहल्ला केला. यात होमगार्ड सूरज पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर विशाल पवार याला पोलिसांनी अटक केली, तर त्याचे दोन साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
कर्नाटक आणि कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडीचा वेग पनवेलमधील काळुंद्रे नदीजवळ कमी होतो. याचाच फायदा उचलत भुरटे चोर, लुटारू या मेल-एक्स्प्रेस गाडीमध्ये घुसून प्रवाशांचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम लुटून पोबारा करतात. चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी काळुंद्रे नदीजवळ रात्रीच्या वेळी गस्त वाढवली. पनवेल रेल्वे स्थानकात कार्यरत असलेले होमगार्ड सूरज पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यासह काळुंद्रे नदीजवळच्या रुळालगत गस्त घालण्यासाठी गेले होते. यावेळी विशाल पवार व त्याचे दोन साथीदार रेल्वे रुळावर शेकोटी पेटवून बसले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले. याचा राग आलेल्या पवारने होमगार्ड पाटील यांच्यावर चाकूहल्ला केला. हल्ल्यानंतर विशाल आणि त्याचे दोन साथीदार पळून गेले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने हल्लेखोर विशालच्या मुसक्या आवळल्या.