
सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या बूटफेकीच्या घटनेवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘‘ती घटना माझ्यासाठी आणि माझे सहकारी विनोद चंद्रन यांच्यासाठीही धक्कादायक होती, पण आमच्यासाठी आता तो विषय संपला आहे,’’ असे गवई म्हणाले.
एका सुनावणीदरम्यान अॅड. गोपाळ शंकरनारायणन यांनी दहा वर्षांपूर्वी न्यायालयात घडलेल्या एका अनुचित घटनेची आठवण सांगितली. त्या वेळी सरन्यायाधीश गवई यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
हल्लेखोर राकेश किशोर याच्यावर कुठलीही कारवाई न करण्याच्या गवई यांच्या भूमिकेशी न्या. उज्ज्वल भुयान यांनी असहमती दर्शवली. ‘‘माझे या सगळ्या प्रकारावर स्वतःचे मत आहे. ज्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, ते देशाचे सरन्यायाधीश आहेत, हा काही जोक नाही. ही गोष्ट कधीही विसरता येण्यासारखी नाही. हल्लेखोर व्यक्तीला त्याच्या कृत्याचा काहीही पश्चात्ताप नाही. हा संस्थेचा अपमान आहे,’’ असे न्या. भुयान म्हणाले.