
इराण-इस्रायल युद्धामुळे गॅस, ऑईल टंचाईचा मोठा प्रश्न उपस्थित झाल्याने याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. गॅस आणि ऑईलचा काळाबाजार करून लोकांची आर्थिक लुटमार होऊ नये याकरिता पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
गॅस, ऑईलचा तुटवडा भासू लागल्याने हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. याचा गॅस व ऑईल माफिया गैरफायदा उचलण्याची शक्यता आहे. शिवाय काही समाजपंटकदेखील याचा गैरफायदा उचलण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेत स्थानिक पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ऑईल माफिया व गॅसचा काळाबाजार करणाऱयांना आपल्या रडारवर आणले आहे.
रेकॉर्डवर असलेल्या काळाबाजार करणाऱया गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलिसांनी गस्त अधिक प्रभावी करण्यास सुरुवात केली असून वडाळा, शिवडी, चेंबूर आदी परिसरात गॅस, ऑईलचा काळाबाजार होऊ नये याची दक्षता घेतली आहे. दरम्यान, गॅस किंवा ऑईलचा काळाबाजार करत कोणी आर्थिक लुटमार करत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



























































