आझाद मैदानात आंदोलन सुरूच, आंदोलनानंतरही ‘मिंध्यां’कडून हजारो ‘आशा’-आरोग्य सेविका वेटिंगवरच!

मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण काम काम करणाऱया हजारो ‘आशा’ सेविका आणि आरोग्य सेविकांनी आजा आझाद मैदानात जोरदार आंदोलन करूनही पालिका आणि मिंधे सरकारकडून कोणत्याही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे उद्या 12 जून रोजीदेखील आझाद मैदानात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे.

‘आशा’, आरोग्य सेविकांनी कोविडसारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी काम केले. अशा ‘आशा’ सेविकांना केवळ 1650 तर आरोग्य सेविकांना 12 हजार रुपये पगार मिळतो. पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी ‘आशा’, आरोग्य सेविकांनी मार्चमध्ये आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना पाच हजार वेतन देण्याची घोषणा केली. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नाही. त्यामुळे आज महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. यामध्ये तीन हजारांवर ‘आशा’ सेविका, आरोग्य सेविकांनी आंदोलनात भाग घेतला. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी निर्देश दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा केली. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. तर मागण्या मान्य झाल्या नसल्याने आंदोलन उद्यादेखील सुरू राहणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेकडून अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी दिली. उद्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

किमान 18 हजार वेतन द्या

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने आरोग्य सेविकांना किमान 18 हजार आणि ‘आशा’ सेविकांना पाच हजार रुपये वेतन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 पासून किमान वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आदेशाची अंमलबजावणी करावी, अतिरिक्त कामासाठी दुपटीने मोबदला देण्यात यावा, गटविमा पिंवा 15 हजार वार्षिक विमा हप्ता द्यावा अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.