ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघिणीच्या 23 सेकंदांच्या व्हिडीओला इटलीतील इटालियन ग्रीन फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळय़ात ‘गोल्डन लिफ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. इटलीतील कॅम्प डॉगिओच्या प्रमुख हॉलमध्ये 30 जुलै रोजी इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात या व्हिडीओची दखल घेण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रात नयनतारा या वाघिणीचा वाहत्या नाल्यातून प्लॅस्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची केवळ हिंदुस्थानात नव्हे तर जगभरात चर्चा झाली होती. अवघ्या 23 सेकंदांचा हा व्हिडीओ वन्यजीवप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केला होता. वाघिणीला असलेली पर्यावरणाची चिंता आणि ताडोबा व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा वन्यजीवांसाठी कसा धोकादायक ठरू शकतो? असे दोन संदेश या व्हिडीओतून मिळाले होते.
इटलीकडून व्हिडीओची दखल
इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळय़ात पर्यावरण आणि निसर्गाशी निगडित हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड अशा विषयांवरील लघुपटांना पुरस्कार दिले गेले. या वेळी दीप काठीकर यांच्या 23 सेपंदांच्या व्हिडीओची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.