तिलक वर्मा फिट; सीओईकडून हिरवा कंदील, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसाठी मोठी खूशखबर आहे. शानदार फलंदाज तिलक वर्मा ग्रोईन इंजरीनंतर अखेर पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. बंगळुरूतील ‘बीसीसीआय’च्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) कडून तिलकला मंजुरी मिळण्याची शक्यता असून, ३ फेब्रुवारीला तो मुंबईत टीम इंडियात सामील होणार आहे. त्यामुळे ७ फेब्रुवारीपासून हिंदुस्थान-श्रीलंका दरम्यान सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपूर्व मालिकेसाठी टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे.

‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले की, ‘तिलक वर्मा फिटनेस चाचणीत पास झाला आहे. ७ जानेवारीला ग्रोईन इंजरीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो सीओईमध्ये सातत्याने सराव करत होता. अंतिम फिटनेस क्लीयरन्ससाठी त्याने शुक्रवारी एक सिम्युलेशन मॅच खेळली आणि त्यात तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसला. या बातमीचा थेट अर्थ असा की, २३ वर्षांचा तिलक वर्मा आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असण्याची शक्यता बळावली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तो श्रीलंका मालिकेआधी होणाऱ्या वॉर्म-अप सामन्यांसाठी हिंदुस्थानी संघात सहभागी होऊ शकतो.

ग्रोईन इंजरीमुळे तिलक न्यूझीलंडविरुद्धची घरच्या मैदानावरील टी-२० मालिका खेळू शकला नाही. त्यावेळी श्रेयस अय्यरला त्याच्या जागी संधी देण्यात आली होती. मात्र, आता तिलक पुन्हा राष्ट्रीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.