हक्काच्या पगारासाठी आंदोलन केल्याने तिळपापड; पालघरमध्ये कंपनीच्या मालकिणीने कामगारांच्या अंगावर गाडी घातली, एक महिला कामगार जखमी

थकीत वेतन आणि हक्कासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कामगारांच्या अंगावर मुस्ताग इंटरप्राईजेस कंपनीच्या मालकिणीने गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुजोरीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पालघर पूर्वेकडील वेवूर येथील मोजे बनवणाऱ्या मुस्ताग इंटरप्राईजेस कंपनीतील कामगार किमान वेतन आणि कामाच्या अटींबाबत व्यवस्थापनाकडे मागणी करत होते. व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी कंपनीच्या गेटसमोर शांततामय आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात महिलांचादेखील मोठा सहभाग होता. याचदरम्यान कंपनीची वयोवृद्ध मालकीण आपल्या गाडीतून गेटसमोर आली असता आंदोलकांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मागच्या सीटवर बसलेली मालकीण ताडताड खाली उतरली आणि तिने ड्रॉयव्हरला खाली उतरवत स्वतः ड्रायव्हिंग करून कामगारांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान तपास सुरू असून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून ‘हा प्रकार म्हणजे मालकिणीच्या मुजोरपणाचा कळस आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संबंधित मालकिणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.