
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टला 11 महिन्यांत 918 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. यामध्ये 579 कोटी रुपयांचे दान हे ऑनलाईन मिळाले आहे. तर 339.20 कोटी रुपये ऑफलाईन मिळाले. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला नोव्हेंबर 2024 ते या वर्षी ऑक्टोबरपर्यंत विविध मार्गांतून 918.6 कोटी रुपयांचे दान मिळाले आहेत. यात सर्वात जास्त श्री वेंकटेश्वर अन्नदानम ट्रस्टला 339 कोटी रुपये मिळाले. त्रिवाणी ट्रस्टला 252 कोटी, बालाजी आरोग्य वरप्रसादिनी योजनेला 98 कोटी मिळाले.
राममंदिराचे दर्शन आणि आरतीची वेळ बदलली
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती राममंदिर ट्रस्टचे डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली. आता लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. त्यामुळे रामलल्लाच्या दर्शनासाठी वेळेत बदल केला जात आहे. रामलल्लाची मंगल आरती जी सकाळी चार वाजता सुरू होत होती, ती आता साडेचार वाजता सुरू होईल. रामलल्लाची श्रृंगार आरती सकाळी सहाच्या ऐवजी आता साडेसहा वाजता सुरू होईल. भाविकांना दर्शन सकाळी साडेसहावाजेपासून सुरू होत होते ते आता सकाळी सात वाजेपासून सुरू होईल.
पाकिस्तानच्या पंजाबमध्ये टोमॅटो 700 रुपये किलो
पाकिस्तानातील कराची, इस्लामाबाद आणि लाहोर यांसारख्या मोठय़ा शहरात टोमॅटोच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील झेलममध्ये एक किलो टोमॅटोची किंमत 700 रुपये किलोवर पोहोचली आहे. गुजरांवालामध्ये 575 रुपये, फैसलाबादमध्ये 500 रुपये, मुल्तानमध्ये 450 रुपये प्रति किलो टोमॅटे मिळत आहेत. अफगाणिस्तान बॉर्डर बंद झाल्यामुळे क्वेटा आणि पेशावर यांसारख्या प्रमुख बाजारात टोमॅटोचे भाव गगणाला भिडले आहेत. इराणकडून काही प्रमाणात सप्लाय चालू आहे.
डोनाल्ड ट्रम्प आता शी जिनपिंग यांना भेटणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात होणारी बैठक अचानक रद्द झाल्यानंतर ट्रम्प हे आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट दक्षिण कोरियात होणार आहे. या बैठकीत रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा केली जाणार आहे. ट्रम्प हे पुढील आठवडय़ात मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपानचा दौरा करणार आहेत. दक्षिण कोरिया दौऱ्यावेळी ते जिनपिंग यांना भेटणार आहेत. पुतीन यांच्यासोबतची नियोजित बैठक रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.



























































