
मोहने येथील एनआरसी कंपनीच्या जमिनीवर अदानी समूह सिमेंट फॅक्टरी सुरू करणार आहे. त्यासंदर्भात आज पर्यावरण विभागाच्या वतीने जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीला टिटवाळा, मोहने, आंबिवली, शहाड येथील हजारो भूमिपुत्रांनी उपस्थित राहून कडाडून विरोध केला. सिमेंट फॅक्टरीच्या प्रदूषणामुळे आमच्या जमिनी नापीक होणार असून आरोग्यही धोक्यात येणार आहे. त्यामुळे एनआरसी जमिनीवर प्रदूषणकारी सिमेंट फॅक्टरी नकोच, असा एकमुखी ठराव करण्यात आला.
अदानी समूहाने सिमेंट फॅक्टरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितल्यानंतर हजारो नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात हरकती दाखल केल्या होत्या. त्यानंतर प्रदूषण मंडळाने या हरकतींवर आज सुनावणी घेतली. यावेळी सिमेंट फॅक्टरीच्या प्रस्तावाला भूमिपुत्र, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रखर विरोध केला.
सुनावणीवेळी श्याम गायकवाड, विजय काटकर, जे. सी. कटारिया, महेंद्र गायकवाड, सुनंदा कोट, नितीन निकम, गोरख जाधव, आशा रसाळ, उदय चौधरी, सुभाष पाटील, दशरथ पाटील, रमण तरे, वैभव पाटील आदींनी अदानी समूहाच्या प्रकल्पासंदर्भात प्रदूषण, आरोग्य व शेतीवर होणारे दुष्परिणाम याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र कंपनीच्या प्रतिनिधींना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे भूमिपुत्रांनी अदानी कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रकल्पाला विरोध दर्शवला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने अदानींची तळी उचलू नये
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली आहे. स्मार्ट सिटी आणि लोकवस्तीत सिमेंट फॅक्टरी उभारणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. तसेच एनआरसी आवारात कामगार वर्षानुवर्षे राहत असून त्यांची देणी देणेदेखील बाकी आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने अदानींची तळी उचलू नये. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचाही मोठा ऱ्हास होणार आहे. याचा फटका येणाऱ्या पिढ्यांना बसू नये यासाठी शासनाने सिमेंट फॅक्टरीला परवानगी देऊ नये अन्यथा रस्त्यावर उतरून शहर आणि परिसरातील गावे बंद ठेवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.
सिमेंट फॅक्टरीला सद्यस्थितीत कोणतीही परवानगी दिलेली नाही. जनसुनावणीत हरकती, आक्षेप ऐकून घेतले असून हा अवहाल पर्यावरण विभागाला पाठवणार आहे. – जयंत हजारे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी

























































