हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचा भाजपला सवाल

टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दक्षिण 24 परगणा (पश्चिम बंगाल) येथे झालेल्या सभेत भाजप आणि राज्यातील विरोधकांवर जोरदार टीका केली. सुवेंदु अधिकारी यांनी बांगलादेशातील युनुस सरकार बंगाल सरकारपेक्षा चांगले प्रशासन चालवत असल्याचे वक्तव्य केले होते, त्यावर प्रत्युत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, दिपू दास यांची बांगलादेशात हत्या झाली असूनही भाजप नेते तेथील शासनाचे गुणगान गात आहेत, हेच भाजपचे हिंदुत्व आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा अपमान करणारे बंगाल वाचवणार का, अशी टीकाही त्यांनी केली.

बॅनर्जी यांनी आरोप केला की, SIR च्या माध्यमातून भाजप बंगालमधील जनतेच्या अधिकारांवर गदा आणू पाहत आहे, मात्र जनता त्यांना योग्य ‘निरोप’ देईल. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बारुईपूर येथून भव्य प्रचारमोहीम सुरू करत असल्याची घोषणा केली. उद्या अलीपूरदुआरला जाणार असून त्यानंतर सलग अनेक जिल्ह्यांना भेट देत जमिनीवर उतरून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी ममता बॅनर्जींचा सैनिक म्हणून तुमच्यासोबत मैदानात लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख करत अभिषेक बॅनर्जी म्हणाले, तयार रहा ‘वॅनिश कुमार’, टीएमसी तयार आहे आणि आम्ही दिल्लीकडे येत आहोत. टीएमसीचे एक तृतीयांश कार्यकर्ते आणि समर्थक दिल्लीला गेले तरी ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांना मोठा दबाव जाणवेल, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपवर टीका केली.