
सिगारेट, तंबाखू आणि पानमसाला उत्पादनांसाठी सरकारने नवीन करप्रणाली अधिसूचना जारी केली आहे. तंबाखू उत्पादनांवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पानमसाल्यावरील नवीन उपकर येत्या 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. परिणामी तंबाखू उत्पादन कंपन्यांचे शेअर्स आज मोठय़ा प्रमाणात घसरले.
नवीन करप्रणालीनुसार, सध्याच्या जीएसटी नुकसानभरपाई उपकराच्या जागी तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पानमसाल्यावर नवीन आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू होईल. जीएसटी नुकसानभरपाई उपकर संपुष्टात आल्यानंतर ‘सिन गुड्स’वर कर आकारण्याच्या पद्धतीतील बदलांचा हा एक भाग आहे. सरकारने या बदलांची घोषणा यापूर्वीच केली असली तरी आता बदलाची तारीख जारी केली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहे. याचा आयटीसी आणि गॉडफ्रे फिलिप्स इंडियासारख्या कंपन्यांच्या (सिगारेट उत्पादक) शेअर्सना सर्वाधिक फटका बसला आहे.
कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज बाजार उघडल्यानंतर मोठी घसरण झाली असून ते 11 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. हा शेअर काल 2,762 रुपयांवर बंद झाला होता. तो आज सुमारे 2,449 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.
- केंद्र सरकारच्या नव्या करप्रणालीच्या अधिसूचनेनंतर आयटीसी कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले. शेअर सुमारे 369.65 रुपयांपर्यंत घसरला असून त्याने 52 आठवडय़ांचा नीचांक गाठला आहे. बुधवारी आयटीसीचा शेअर सुमारे 403 रुपयांवर बंद झाला होता.
- 1 फेब्रुवारी 2026 पासून सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांवर जीएसटी नुकसानभरपाई उपकराऐवजी अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू होईल.




























































