
यावेळी प्रथमच मतदार सावध, जागरूक आणि कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेला दिसत आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच शिवसेनेचा 24 वा महापौर करण्यासाठी आजचे मतदान आहे असेही संजय राऊत म्हणाले.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, लोकांनी ठरवले आहे. उद्धवजी आणि राजजी यांनी निर्माण केलेली जागरूकता, केलेले जागरण आणि तयार केलेले वातावरण यामुळे लोकांमध्ये “आपण मतदान केलेच पाहिजे” ही भावना निर्माण झाली आहे. हे मतदान मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आहे. यावेळी प्रथमच मतदार सावध, जागरूक आणि कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेला दिसत आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या भावनेलाच हात घातला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये, कर्नाटकात, पंजाबमध्ये, उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये सर्वत्र आपापल्या भाषिकांच्या भावनांना हात घातला जातो. मग महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाच्या भावनेला हात घातला जातो, तर प्रश्न कसे काय विचारले जातात?
मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. तिथे नाही जायचे, तर कुठे जायचे? त्यांनी आम्हाला आवाहन करावे की तुम्ही मुंबादेवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. ती त्यांच्या बापाची देवी आहे का? देवी मुंबईची आहे. मुंबादेवीवरूनच मुंबईचे नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई घडवली, नामांतर केले. हे लोक घाबरलेले आहेत, त्यांचे पाय लटपटत आहेत. सातबारावर बेकायदेशीरपणे मुंबईच्या नावावर आपले नाव टाकता येईल, असे त्यांना वाटते. पण आमच्या बाप-जाद्यांची मुंबई आम्ही कुणालाही देणार नाही. मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबादेवी मराठी माणसाची आहे. भाजपला हा इतिहास माहिती नाही, कारण त्यांचा मराठी माणसाच्या भावना आणि संवेदनांशी काहीही संबंध नाही असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेने 23 मराठी महापौर दिले आहेत. आजचे मतदान हे शिवसेनेचा 24 वा महापौर करण्यासाठी आहे. एवढेच मी सांगतो असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.































































