
जर तुम्ही हायवे किंवा एक्सप्रेसवेवरून वारंवार प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेत १० एप्रिलपासून टोल प्लाझावरील रोख व्यवहार (Cash Payment) पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. या नवीन नियमांमुळे लाखो प्रवाशांच्या खिशावर भार पडणार असून प्रवासाची पद्धतही बदलणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्णयानुसार, आता देशभरातील नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवेवर टोल टॅक्स रोखीने स्वीकारला जाणार नाही. टोल नाक्यांवर रोख पेमेंटमुळे लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
FASTag अनिवार्य; अन्यथा सव्वापट भुर्दंड
ज्या वाहनांकडे फास्टॅग नसेल, त्यांना UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. मात्र अशा प्रवाशांना सामान्य शुल्काच्या १.२५ पट (सव्वापट) जास्त पैसे मोजावे लागतील. म्हणजेच फास्टॅगशिवाय प्रवास करणे आता महाग पडणार आहे.
नियम मोडल्यास कडक कारवाई
जर वाहनचालकाने फास्टॅग किंवा UPI दोन्हीचा वापर केला नाही, तर त्या वाहनाला हायवेवर प्रवेश नाकारला जाऊ शकतो किंवा तेथून हटवले जाऊ शकते. अशा वाहन मालकांना ई-नोटीस पाठवली जाईल.
ई-नोटीस मिळाल्यानंतर ३ दिवसांच्या आत टोल न भरल्यास, दुप्पट शुल्क दंड म्हणून भरावे लागेल.
वार्षिक पासची सुविधा
खाजगी कार मालकांसाठी ३,०७५ रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पासच्या माध्यमातून वर्षभरात २०० वेळा टोल प्लाझा पार करता येईल, जे नियमित प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल.


























































