पर्यटनाच्या मुरूड गावात खड्ड्यांची समृद्धी

दापोली तालुक्यातील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून मुरूड या गावाला पहिली पसंती मिळते. अशा या गावात जाण्यासाठीच्या आसुद ते मुरूड दरम्यानच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना आपल्या ताब्यातील वाहन खड्डे चुकवत मुरूड गावात नेताना नाकी दम येत आहे.

दापोली तालुक्यातील मुरूड हे गाव भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे मुळ गाव या गावाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. येथील स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टी ही पर्यटकांना अधिक भावत असल्याने एकदा येऊन गेलेले पर्यटक हे परत परत मुरूड या गावात पर्यटनासाठी येत असतात. इतके मुरूड हे पर्यटकांना ठिकाण आवडते. अशा या पर्यटनाच्या गावात पावसाळा असल्याने पर्यटन व्यवसाय हा मंदावला असला तरी वर्षा सहलीसाठी येणारे तसेच अधून मधून येणाऱ्या पर्यटकांमुळे या मार्गावर वाहनांची तशी वर्दळच आहे. त्यामुळे येथील रस्त्यांमध्ये पडलेल्या खाच खळग्यातील रस्त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातूनच महागडी वाहने पर्यटकांना घालावी लागत आहेत. ही परिस्थिती अजून किती काळ चालेल हे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागच सांगू शकणार असले तरी आज त्याचा परिणाम हा पर्यटन व्यवसायावर होत आहे.

मुरूड या गावातील सृष्टी सौंदर्याने नटलेल्या निसर्गनिर्मित गावाची कलावंत, खेळाडू, व्यवसायिक, नोकरदार, राजकारणी, अधिकारी आदींसह अनेकांना निसर्गाने चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे यातील अनेकांनी मुरूडमध्ये जागा जमिनी घेऊन रिसॉर्ट, हॉटेल, निवासी सुविधा आदी पर्यटन आधारीत विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहेत. काही करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अशा या मुरूड गावात सोयी सुविधांच्या उपलब्धतेची मात्र चांगलीच कमी आहे, त्यात प्रामुख्याने रस्त्याची सुविधा ही फार महत्वाची बाब आहे. असे असतानाही प्रशासनातील अधिकारी असतील वा राजकारणी असतील हे येथे सोयी सुविधा कार्यान्वित होण्याकडे का बरं लक्ष देत नाहीत. हा मात्र संशोधनाचाच विषय असला तरी येथील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्याचा थेट परिणाम हा पर्यटन व्यवसायावर झाला आहे. ही परिस्थिती बदलणार केव्हा याकडे आसुद, मुरूड, कर्दे आदी गावांचे लक्ष लागून राहिले आहे.