
रात्रीच्या सुमारास लाकडी तंबू अंगावर कोसळल्याने एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झाला असून, तीन पर्यटक जखमी झाले आहेत. केरळमधील वायनाडमध्ये बुधवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. निशमा असे मयत तरुणीचे नाव असून ती मलप्पुरम येथील रहिवासी आहे. जखमी पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी 900 कांडी येथे एका रिसॉर्टमध्ये ही घटना घडली. हे एक प्रमुख इको-टुरिझम डेस्टिनेशन आहे. लाकडी खांब आणि सुकलेल्या गवतापासून हा तंबू बनवण्यात आला होता. या तंबूत चार पर्यटक होते. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा तंबू अचानक कोसळल्याने ही घटना घडली. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेनंतर रिसॉर्टमधील तंबूची सुरक्षा मानके तपासली जात आहेत. प्रशासनाने रिसॉर्टमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.