राधानगरी आणि करवीर तालुक्यासाठी जीवनदायिनी असलेल्या तुळशी धरणाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. धरण परिसर मद्यपींचा अड्डा बनला असून, दोन कर्मचाऱयांवर धरणाचा भार आहे. शनिवारी दुपारी काही मद्यपी पर्यटकांनी चौकीदारावर हल्ला केला. यावेळी पर्यटकाने केलेला चाकूहल्ला चौकीदाराने चुकविल्यामुळे दुर्घटना टळली. मात्र, अशा प्रकारामुळे धरण कर्मचाऱयांसह धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन 1970च्या दशकामध्ये बांधलेल्या तुळशी धरणाची पाणीसाठवण क्षमता 3.47 टीएमसी इतकी आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी दोन चौक्या उभारण्यात आल्या आहेत. धरणावर जलसंपदा विभागाचा एकच चौकीदार कार्यरत आहे. धरणावर येण्यासाठी चार मार्ग असल्याने धरणावर मोठय़ा प्रमाणात हुल्लडबाज पर्यटकांचा उपद्रव सुरू असतो. काही पर्यटकांनी धरणावरील पथदिवे फोडल्याने ते बंद आहेत. शनिवारी दुपारी काही हुल्लडबाज पर्यटक धरणाच्या मुख्य गेटवर येऊन मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत होते. यावेळी येथे कार्यरत असणारे चौकीदार सुभाष पाटील यांनी रोखले. त्यामुळे चिडलेल्या पर्यटकाने पाटील यांच्यावर चाकूहल्ला केला. मात्र, पाटील यांनी उडी मारत हल्ला चुकविला. त्यामुळे पाटील बचावले. त्यानंतर पाटील यांनी याबाबत राधानगरी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच पर्यटकाने हल्ला केलेला चाकू पाटील यांनी पोलिसांकडे जमा केला आहे.
धरणावर सीसीटीव्ही यंत्रणाच नाही
धरणावर सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने हल्लेखोर पर्यटकाची ओळख पटविणे अशक्य आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. धरणावरील पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीअभावी बहुतांशी पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. धरणाच्या खाली थेट नदीपात्रात जेवणावळी होतात. याच्या पत्रावळ्या, प्लॅस्टिक ग्लास, दारूच्या बाटल्या थेट धरणपात्रात टाकल्या जात आहेत. पाणलोटक्षेत्रातही अशीच स्थिती आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी धरणावर पोलीस नाका आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.