माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची कोंडी; प्रवासी कर भरण्यासाठी एकच खिडकी नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा फटका

दोन दिवस सलग सुट्टया आल्याने राज्याच्या विविध भागांतून असंख्य पर्यटकांनी निसर्गरम्य माथेरानकडे कूच केली खरी पण दस्तुरी नाक्यावर पोहोचताच त्यांची अक्षरशः कोंडी झाली. प्रवासी कर भरण्यासाठी दोनपैकी फक्त एकच खिडकी उघडी ठेवल्याने पर्यटकांची भलीमोठी रांग लागली. माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला असून पर्यटकांना आवश्यक असलेल्या सुविधा न दिल्याने त्यांच्या संतापाचा स्फोट झाला. अनेकांनी प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहिली.

वाहतूककोंडीसह अनेक अडचणींवर मात करीत पर्यटक दस्तुरी नाक्यापर्यंत येऊन पोहोचले. प्रत्यक्ष माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी ५० रुपये एवढा कर भरावा लागतो. त्यासाठी नगर परिषदेने दोन तिकीट खिडक्या उभारल्या आहेत. पण शनिवार व रविवारी त्यातील एक खिडकी बंद ठेवली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण पडला. दुसऱ्या दिवशीही ट्रॅफिकजामचा फटका माथेरानच्या घाटामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पर्यटकांना ट्रैफिकजामचा फटका सहन करावा लागला. रस्त्यावर वाहनांची तुफान गर्दी झाली होती. अनेकांनी वाहनातून उतरत दस्तुरी नाका गाठला.

तासन्तास लटकंती
प्रवासी कर वसुली नाक्यावर आज रविवारच्या दिवशी सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी उसळली. पण एकच खिडकी खुली असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना कर भरणा करता आला. तोपर्यंत अनेकांचा घामटा निघाला.

बलेनो गाडीने पेट घेतला
कर्जत-पळसदरी मार्गावरील नागुर्ले येथे माथेरानच्या दिशेने जाणाऱ्या बलेनो गाडीने अचानक पेट घेतला. गुजरातमधून पर्यटक आला होता. या गाडीतील हर्षद प्रजापती याने बाहेर धूम ठोकल्याने त्याचा जीव वाचला.