दोन महिन्यांत एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिकचा जांगडगुत्ता संपणार; रंगरंगोटी, सफाईची कामे अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गॅस गळतीमुळे तब्बल 34 तास बोरघाट ठप्प होता. अधूनमधूनही वाहतूककोंडीची कटकट कायम असते. मात्र पावसाळ्यापूर्वी एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिकचा जांगडगुत्ता संपण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आठ किमीच्या मिसिग लिंकचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी व सफाईची कामे युद्ध पातळीवर केली जात आहेत. त्यामुळे मिसिंग लिंकच्या उद्घाटनाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

बोरघाटातील खोपोली

बायपास ते लोणावळा सिंहगड कॉलेज अशा 8 किमी अंतराच्या सह्याद्रीच्या पोटातून जाणाऱ्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून 2026 च्या पावसाळ्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला खुल केला जाणार आहे. या मिसिंग लिंक मार्गावर महाकाय 2 बोगदे तसेच 2 केबल पूल असून तब्बल 7 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. तालुक्यातील आडोशी गावच्या हद्दीतून खोपोली बायपास मार्गापासून सुरू होणाऱ्या या मार्गावर चार लेन पुण्यासाठी तर मुंबई मार्गिकेवर चार लेन असून खंडाळा व लोणावळा असा थेट सिंहगड महाविद्यालयाच्या जवळ हा बोगदा निघणार आहे. या मार्गाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अंतर जवळपास 8 किमीने कमी होणार असून 25 मिनिटांची प्रवासात बचत होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिले होते लक्ष

चावणी खोऱ्यातील गर्द झाडी व पावसाळ्यातील धबधबे असा निसर्गान बहरून निघणाऱ्या मिसिंग लिंकचे काम कोविड कालावधीत काही काळ ठप्प होते. मात्र या प्रकल्पाला चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करत खंडाळा येथील बोगद्याचे व मार्गाच्या कामाची जातीने पाहणी केली होती. लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले होते.

मिसिंग लिंक मार्गावर चावणी गावच्या हद्दीत होणाऱ्या केबल पुलाचे अंतर 645 मीटर लांब व उंची तब्बल 135 मीटर आहे. हा पूल पर्यटकांचे आकर्षण असणार आहे.

दुसरा पूल 770 मीटर लांब व 30 मीटर उंच असणार आहे. त्यापुढे जमिनीच्या 150 मीटर खालून जवळपास 2 किमी अंतराचे 2 समांतर बोगदे असून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी दर 500 मीटर अंतरावर बोगद्याला जोडले जाणार आहेत.