
रेल्वे प्रशासनातील कामगार संघटनांमध्ये रेल कामगार सेनेचा दबदबा वाढला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल कामगार सेना खंबीरपणे उभी राहत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेकडो ट्रेन मॅनेजरनी रेल कामगार सेनेमध्ये प्रवेश केला आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी) आणि कार्यध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेन मॅनेजरना प्रवेश देण्यात आला.
रेल कामगार सेना ट्रॅफिक ब्रँचच्या वतीने ट्रेन मॅनेजर कॅडरसाठी विविध कामे करण्यात आली. ट्रेन मॅनेजरचे बऱ्याच महिन्यांपासून रखडलेले रेल्वे वसाहतीचे काम केले. तसेच 6 ते 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेला ओटी भत्ता मिळवून देण्यात आला. महिला ट्रेन मॅनेजरसाठी कल्याण गुड्स लॉबीमध्ये विशेष महिला चेंजिंग रूम सुरू केला. पनवेल गुड्स ट्रेन मॅनेजर ड्युटीवर असताना झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना खंबीरपणे साथ दिली. अशा विविध कामांमुळे प्रेरित होऊन शेकडो ट्रेन मॅनेजरनी रेल कामगार सेनेचा भगवा हाती घेतला.
रेल कामगार सेनेचे केंद्रीय उपाध्यक्ष संतोष मोहन देवळेकर, ट्रॅफिक ब्रँचचे अध्यक्ष संदिप गिम्हवणेकर, खजिनदार हरिभाऊ सुतार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रेन मॅनेजरनी रेल कामगार सेनेत प्रवेश केला. नरेश बुरघाटे, भारत शर्मा, मल्हारी भटाटे, नरेंद्र तळेकर, सूरज निकाळजे, अजय जामघरे उपस्थितीत होते.