कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा चार तास लेट!

कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रेन शेडय़ूल तयार करताना कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कटले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया बहुतांशी रेल्वे गाडय़ा निर्धारित वेळेपेक्षा तीन-चार तास विलंबाने धावत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून तासन्तास प्रवाशांना रेल्वे स्थानकात गाडय़ांच्या प्रतीक्षेत बसावे लागत आहे.

लवकरच शाळा, कॉलेज सुरू होणार आहेत. मे महिन्याच्या सुट्टीत गावी आलेले मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. 14 जूनपर्यंत मुंबईकडे जाणाऱया सर्व रेल्वे गाडय़ांचे बुकिंग हाऊस फुल्ल आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱया सर्वच रेल्वे गाडय़ा प्रवाशांच्या गर्दीने धावत आहेत. आता पावसाळा सुरू झाला असून दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळी हंगामातील वेळापत्रकाची अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.