
राज्य पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या 10 अधिकाऱयांच्या बदलीचे आदेश आज जारी करण्यात आले. याबरोबर राज्य पोलीस दलातील सहा अधिकाऱयांच्याही बदल्या करण्यात आल्या.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी दीपक पांडे यांच्याकडे पोलीस दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान व परिवहन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर प्रवीण सांळुखे हे आता लोहमार्गचे अपर पोलीस महासंचालक असतील. तसेच सुरेश मेकला यांच्याकडे राज्याच्या वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबरोबर सुनील रामानंद (नियोजन व समन्वय), अमिताभ गुप्ता (विशेष कृती दल) याशिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके-महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, अश्वती दोरजे-नागरी हक्क संरक्षण, छेरिंग दोरजे-कायदा व सुव्यवस्था (महाराष्ट्र राज्य), रंजन कुमार शर्मा-सहआयुक्त (पुणे शहर), डी.के. पाटील-भुजबळ-नागपूर परिक्षेत्र अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.