
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर खासगी चार्टर विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार्टर विमानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी दाखवून देत संसदीय स्थायी समितीने पाच महिन्यांपूर्वी संसदेत अहवाल सादर केला होता. विमान वाहतुकीचा विस्तार देखरेखीच्या क्षमतेपेक्षा वेगाने होत आहे. सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष घातक ठरेल, असे समितीने अहवालात म्हटले होते. तो अहवाल कागदावरच असल्याने खासगी चार्टर विमानांचा प्रवास अद्याप धोक्याचाच ठरत असल्याचे मत हवाई क्षेत्रातील वाहतूकतज्ञांचे मत आहे.
संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात खासगी चार्टर विमानांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत. समितीने देशाच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा प्रणालीतील गंभीर त्रुटींबद्दल इशारा दिला होता. वेगाने वाढणाऱ्या खासगी चार्टर विमानांच्या क्षेत्राशी संबंधित धोक्यांवर प्रकाश टाकला होता. जेडीयूचे खासदार संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संसदेत सादर करण्यात आला होता. समितीने व्यावसायिक विमान कंपन्यांनी अवलंबलेली प्रणाली आणि खासगी विमान वाहतुकीतील असमान पालन यातील फरक स्पष्ट केला. कॉर्पोरेट जेट्स आणि चार्टर सेवांचा वेगाने विस्तार होत आहे. त्या तुलनेत सुरक्षा देखरेख यंत्रणांचा विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर काही भागांना अधिक कठोर तपासणीची आवश्यकता असल्याचे संसदीय समितीने अहवालात म्हटले आहे.
तांत्रिक आणि सुरक्षा कर्मचाऱयांची कमतरता
संसदीय समितीने खासगी चार्टर सेवांची देखभाल मानके, दस्तऐवजीकरण शिस्त आणि परिचालन नियंत्रण संरचना अशा विविध गोष्टींबाबत चिंता व्यक्त केली होती. काही चार्टर कंपन्यांकडे तांत्रिक आणि सुरक्षा कर्मचाऱयांची कमतरता आहे. त्याचा देखभाल आणि देखरेखीवर परिणाम होऊ शकतो, असे समितीने नमूद केले. याचवेळी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अचानक तपासणी आणि कठोर ऑडिटद्वारे खासगी चार्टर सेवांवर पाळत वाढवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. मात्र मागील पाच महिने समितीचा अहवाल कागदावरच राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
50 कोटी विमा, तज्ञ पायलट
बारामतीमध्ये अपघात झालेल्या व्हीएसआर एव्हिएशनच्या मालकीच्या खासगी लियरजेट 45 विमानाचा 50 कोटी रुपयांचा विमा होता. 15 वर्षे जुन्या विमानासाठी आयआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडून ‘एव्हिएशन एन्शुरन्स पॉलिसी’अंतर्गत विमा कवच घेण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने आता विमा संरक्षणाची रक्कम देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. अपघातग्रस्त विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर होते. ते 16 हजार तासांचा फ्लाईंग अनुभव असलेले तज्ञ वैमानिक होते. त्यांनी यापूर्वी विविध कंपन्यांमध्ये सेवा केली होती.
कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे सरकारला पत्र
चार्टर विमानांच्या देखभालीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. बारामती येथील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर व्हीएसआर एव्हिएशन कंपनीच्या चार्टर विमानांची देखभाल सुविधा, टेक्निकल लॉग्स आणि ऑपरेशनल रेकॉर्ड्सचे तातडीने ‘सरप्राईज इन्स्पेक्शन’ करावे, तसेच कथित त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्रातून केली आहे.



























































