
महाविनाशकारी वाढवण बंदर, बुलेट ट्रेनसह पालघर जिह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या विरोधात सुरू झालेला आदिवासींचा एल्गार आज तिसऱ्या दिवशीही कायम होता. सोमवारची रात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढल्यानंतर आदिवासींनी पालघर-बोईसर रस्त्यावर ठिय्या मांडला. मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयावर भव्य मोर्चा तसेच रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुमती जाखड यांनी आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाबरोबर तब्बल आठ तास मॅरेथॉन बैठक घेतली. तरीदेखील भूमिपुत्रांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंदोलन चिघळण्याची शक्यता
आदिवासींचा संताप आणि त्यांच्या मागण्या याची दखल पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुमती जाखड यांनी घेऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. त्यात आमदार विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे, मरीअम ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते. त्यांनी एकूण बारा मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. पण मॅरेथॉन बैठकीनंतरही त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांचे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.





























































