संगमेश्वरच्या फुणगुस येथे वळणावर ट्रक दरीत कोसळला; गुगल मॅपने पुन्हा घात, 15 दिवसात तिसरा अपघात

संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी गुरुवारी सकाळी 10 वाजता दुसरा अपघात झाला आहे. गोव्याहून वसईकडे जाताना गुगल मॅपद्वारे फुणगुसमार्गे हा ट्रक जात होता. फुणगुस येथील अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे तो बचावला आहे.दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा अपघात झाला होता. 15 दिवसातील हा तिसरा अपघात आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघाताने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन ट्रक गोव्याहून वसईकडे जात होता. यामध्ये सात टन माल होता. फुणगुस येथील अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट 40 फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला आहे. घटनेनंतर ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. चालकाला दरीतून वर आण्यात आले. याच ठिकाणी 12 दिवसांपूर्वी कार दरीत कोसळली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी आयशर टेम्पो कोसळला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ट्रक दरीत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती पोलिस पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.