हिंदुस्थानवर अमेरिका 500 टक्के टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा जबर दणका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज हिंदुस्थानला दुहेरी दणका दिला. रशियाकडून तेल खरेदी करणाऱया देशांवर 500 टक्के टॅरिफ लावण्यास ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला. तसेच हिंदुस्थानच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल सोलार अलायन्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयांमुळे हिंदुस्थानच्या आर्थिक अडचणी वाढणार आहेत.

युक्रेनविरुद्धचे युद्ध रशियाने थांबवावे यासाठी ट्रम्प आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तेलसमृद्ध रशियाच्या नाडय़ा आवळण्याची रणनीती ट्रम्प यांनी आखली आहे. जगातील कोणत्याही देशाने रशियाकडून तेल घेऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदुस्थान त्यांचे मुख्य लक्ष्य आहे. याआधीही ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त टॅरिफ लावलाच आहे. त्यानंतरही हिंदुस्थान-रशिया व्यापार सुरू असल्याने आता ट्रम्प यांनी पुढचे पाऊल उचलले आहे.

त्यासंदर्भातील विधेयकाला ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शवला आहे. रशियाकडून तेल घेणाऱया देशांवर 500 टक्के टॅरिफ लावण्याची तरतूद त्यात आहे. पुढील आठवडय़ात हे विधेयक मंजुरीसाठी अमेरिकन काँग्रेसपुढे येणार आहे. ते मंजूर झाल्यास हिंदुस्थान, चीन व ब्राझील यांच्यावर 500 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचे अधिकार ट्रम्प यांना मिळणार आहेत.

शेअर बाजार गडगडला; 8 लाख कोटींचे नुकसान

ट्रम्प यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद हिंदुस्थानी शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स 780 अंकांनी घसरून 84,181 पर्यंत खाली आला, तर निफ्टी 264 अंकांनी घसरून 25,877 वर स्थिरावला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 7 ते 8 लाख कोटींचे नुकसान झाले. निफ्टीतील 50 पैकी 45 कंपन्यांना आजच्या घसरणीचा फटका बसला. सर्वाधिक नुकसान कोळंबी निर्यातदार कंपन्यांचे झाले.