
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफचा वापर शस्त्रासारखा करत आहे. जगावर अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, डॉलरचे मूल्य आणि वापर कमी होत असल्याने त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातच टॅरिफमुळे अमेरिकेचेच जास्त नुकसान होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वयक्त केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांनी डॉलरच्या घसरणीबाबत मोठे विधान केले आहे. गेल्या अनेक दशकापासून डॉलरला राखीव चलनाचा दर्जा मिळाला आहे. हा दर्जा गमावणे म्हणजे महायुद्धातील पराभवासारखे आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
1944 पासून जगातील राखीव चलनाचा दर्जा असलेल्या अमेरिकन डॉलरमध्ये या वर्षी दशकांमधील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. त्यातच आता ट्रम्प यांनी टॅरिफमुळे जगाची चिंता वाढवली आहे. ट्रम्प यांनी जपान, ब्राझील, दक्षिण कोरिया, इंडोनेशियासह सर्व देशांवर परस्पर टॅरिफची घोषणा केली आहे. ते 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. तसेच ट्रम्प ब्रिक्स देशांवरील त्यांची भूमिका सतत कठोर करत आहेत आणि त्यांना अतिरिक्त टॅरिफची धमकी देत आहेत. ट्रम्प यांच्या ब्रिक्सवरील कठोर धोरणामागील सर्वात मोठे कारण म्हणजे डॉलरचे जागतिक वर्चस्व आणि त्यासंबंधीची चिंता यावरून डॉलरच्या घसरणीची अमेरिकेची वाढती चिंता दिसून येते.
राखीव चलनाचा दर्जा गमावणे हे महायुद्धातील पराभवासारखे असेल. डॉलरच्या घसरणीमुळे अमेरिका पूर्णपणे बदलेल आणि तो पूर्वीसारखा देश राहणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ब्रिक्स देशांनी डॉलरचे वर्चस्व कमकुवत करण्यासाठी रणनीती आखत पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ब्रिक्स देशांनी डॉलरव्यतिरिक्त इतर आर्थिक पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. अनेक देश अमेरिकन डॉलरऐवजी त्यांच्या कायमस्वरूपी चलनात व्यापार करत आहेत. यामुळे ट्रम्प संतापले आहेत आणि त्यांनी ब्रिक्स देशांवर (ब्राझील, रशिया, हिंदुस्थान, चीन आणि दक्षिण आफ्रिका इत्यादी) अतिरिक्त कर लादण्याची धमकी दिली आहे.
1944 पासून, अमेरिकन डॉलर हे इतर देशांद्वारे वापरले जाणारे प्राथमिक राखीव चलन राहिले आहे. जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी डॉलरचा साठा त्यांच्याकडे ठेवतात. याशिवाय, देश, व्यवसाय आणि लोक बहुतेकदा व्यापारासाठी त्याचा वापर करतात. अहवालांनुसार, सुमारे 90% परकीय चलन व्यवहार डॉलरमध्ये केले जातात आणि यामुळे ते जगातील राखीव चलन बनते.
ब्रिक्स देश डॉलरचे वर्चस्व कमी करण्यासाठी सक्रियपणे उपाययोजना करत आहेत. त्यामध्ये स्विफ्ट पेमेंट नेटवर्क आणि कमोडिटी-आधारित ब्रिक्स चलनाच्या पर्यायांवर चर्चा समाविष्ट आहे. अद्याप कोणतेही एकीकृत चलन उदयास आले नसले तरी, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील ब्रिक्स देशांच्या विस्तारामुळे व्यापाराचा वाढता आकार डॉलरच्या आवाक्याबाहेर गेला आहे. काही मध्यवर्ती बँका यूएस ट्रेझरीजमधील त्यांचे होल्डिंग कमी करून सोन्याचे साठे देखील वाढवत आहेत.
डॉलर दशकांमधील सर्वात मोठ्या घसरणीचा सामना करत आहे आणि युरो, पेसो आणि येन सारख्या चलनांच्या तुलनेत वेगाने वाढत आहेत. 2025 मध्ये येन-युरोच्या तुलनेत डॉलर 10 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सुरुवातीच्या महिन्यांत त्याचे मूल्य 1973 नंतर सर्वात जास्त घसरले आहे. यूएस डॉलर निर्देशांक 97.48 वर घसरला, जो गेल्या वर्षाच्या अखेरीस 109 वर गेला होता.
जेपी मॉर्गनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात विश्लेषकांनी म्हटले आहे की ट्रम्प टॅरिफ धोरण जागतिक आर्थिक वाढीला अडथळा आणू शकते. त्यामुळे महागाईचा धोका वाढेल आणि मंदीची 40% शक्यता असेल, ज्याचा थेट परिणाम डॉलरच्या मूल्यावर होईल. याशिवाय, अनेक आर्थिक विश्लेषक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि म्हणत आहेत की डॉलरचे वर्चस्व हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.