मुंबईत पहिल्याच पावसात दोन बळी; विक्रोळीत स्लॅब कोसळला; बस अपघातात दोन जखमी

मुंबईत रविवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अपघातांनाही सुरुवात झाली असून विक्रोळीत स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला, तर घाटकोपर येथील बस दुभाजकावर आदळून झालेल्या दुर्घटनेत चालकासह एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तसेच पावसाच्या जोरामुळे काही भागात पाणी साचल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, तर मंगळवारीदेखील मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईत रविवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार बरसायला सुरुवात केल्याने काही वेळातच पवई, अंधेरी, बोरिवली, कुर्ला आदी भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, मुंबईसह राज्यात पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार असून मुंबई, ठाणे, पालघर तर कोकण पट्टय़ात रत्नागिरी, कुडाळ, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, अमरावती अकोला, यवतमाळ आदी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विक्रोळी पश्चिमच्या टाटा पॉवर हाऊस येथील एका बांधकाम सुरू असलेल्या ग्राऊंड प्लस पाच माळय़ाच्या एसआरए इमारतीचे स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नागेश रेड्डी (38) आणि रोहित रेड्डी (10) यांच्यावर भलेमोठे स्लॅब कासळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना पालिकेच्या जवळच्याच राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, तर दुसऱ्या घटनेत घाटकोपर येथील कोटक महिंद्रा बँकजवळील दुभाजकाला बस नंबर 1453 रुट नंबर 533/1 धडकली. या घटनेत चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

24 तासांत झालेला पाऊस

मुंबई शहर      100.96 मिमी

पूर्व उपनगर    73.78 मिमी

पश्चिम उपनगर      61.28 मिमी

पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

मुंबई शहर आणि उपनगरात रात्री 8 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी, हिंदू कॉलनी, हिंदमाता, लालबाग, वरळी, परळ, शिवडी ते वडाळा येथे तर पूर्व उपनगरात टागोरनगर विक्रोळी, साकीनाका, मुलुंड, भांडुप, विद्याविहार आणि पश्चिम उपनगरातून दहिसर, चेक नाका, अंधेरी, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, मालाड या भागातून पाणी साचल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. संबंधित ठिकाणी कार्यवाही करून पाण्याचा निचरा केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुंबई शहरात 17 ठिकाणी, पूर्व उपनगरात 7 तर पश्चिम उपनगरात 27 ठिकाणी अशा 53 ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही, तर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी 2 ठिकाणी घर-घराचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. 

आज ‘यलो अलर्ट’

मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळ राहणार असून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा कुलाबा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईला सावधगिरीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

समुद्रालाही उधाण येणार असून दुपारी 2.38 वाजता 3.54 मीटर तर 3.43 मिनिटांनी 4.11 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे गरज असली तरच घरातून बाहेर पडा असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.