समृद्धी महामार्गाचा मोबदला लटकवला; मानसिक धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, 1 मेपासून बेमुदत उपोषण

सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे गेल्या चार वर्षांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशवंत पंडित व यशोदा पंडित अशी त्यांची नावे आहेत. सरकारने आठ वर्षांपासून समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला लटकवल्याच्या मानसिक धक्क्याने त्या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी 1 मेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा शहापुरातील संतप्त शेतकऱ्यांनी सरकारला दिला दिला आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते भिवंडी असा अखेरचा टप्पा पूर्ण झाला असून त्याचे 1 मे रोजी लोकार्पण करण्याचे वेध सरकारला लागले आहेत. या महामार्गासाठी सरकारने 2017 मध्ये शहापुरातील अंदाड येथील विधवा महिला आणि मजूर शेतकरी अशा एकूण सात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र आठ वर्षे उलटूनही त्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिलाच नाही. वारंवार सरकारचे उंबरठे झिजवूनही हाती निराशा आल्याने या शेतकऱ्यांना मानसिक धक्का बसला आणि सरकारने आपली फसवणूक केली या धसक्याने त्यांचा मृत्यू झाला.

या शेतकऱ्यांची फसवणूक

समृद्धी महामार्गासाठी अंदाडमधील मजूर शेतकरी गुलाम भोईर, जयराम गाडगे, यशवंत पंडित व विधवा महिला बेबी पवार, सविता भडांगे, पूनम मोगरे, नीरा भेरे अशा सात जणांची किमान दहा एकर क्षेत्र संपादित करण्यात आले होते. आज संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर धडक देत जमिनीचा तत्काळ मोबदला द्या, अन्यथा समृद्धी महामार्गावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.