
लातूर-जहीराबाद महामार्गावर रमाई पेट्रोल पंपासमोर रविवारी सायंकाळी एका भरधाव खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपतात दोन तरुण जागीच ठार झाले. कृष्णा हरी सूर्यवंशी (वय- 22) आणि अजय दत्ता गायकवाड (वय – 21) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील रहिवासी कृष्णा आणि अजय हे दोघे रविवारी सायंकाळी7.30 च्या सुमारास औरादकडून निलंगा शहराकडे दुचाकीने येत होते. यावेळी लातूर-जहीराबाद हायवेवर रमाई पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. याच दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हल्स चालकाच्या चुकीमुळे आणि हलगर्जीपणाने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
दरम्यान, अपघातानंतर तत्काळ निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्राथमिकदृष्ट्या ट्रॅव्हल्स चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न होत असून निलंगा पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.





























































