
सरकारच्या अनास्थेमुळे राज्यात आज एकाच दिवशी दोन तरुणांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. विधान भवन आणि धाराशीवमध्ये या घटना घडल्या. विधान भवनाबाहेर सोलापूरच्या तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
दादासो बबन कलसैत (38) असे या तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिह्यातील माढा तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी आहे. घटनेनंतर पोलिसांनी कलसैत याला ताब्यात घेत चौकशी केली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी केलेल्या चौकशीत लोहार समाजाच्या जमिनीवर उभारलेला विश्वकर्माचा पुतळा नगरपंचायतीने अलीकडेच हटवला होता. यामुळे संतप्त झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कलसैतविरोधात कलम 226 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
धाराशीवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकले
गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱयांची बैठक सुरू होती त्या सभागृहाजवळच हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीच्या सभागृहात जाण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मात्र सुरक्षा कर्मचाऱयांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. यामुळे संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते आणि उपस्थित माध्यम प्रतिनिधींनाही केबिनच्या बाहेर जाण्याचे निर्देश दिले.
























































