
मध्य प्रदेशातील सेहोर जिल्ह्यात कुबेरेश्वर धाम येथे चेंगराचेंगरीची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला असून सुमारे पाच भाविक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. श्रावण महिन्यातील कंवर यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक कुबेरेश्वर धाम येथे पोहोचले होते. यादरम्यान भाविकांच्या गर्दीत अचानक हाणामारी सुरू झाली. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. 16 फेब्रुवारी 2023 रोजी रुद्राक्ष वाटप कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. यात नाशिक येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. वाढती गर्दी पाहून प्रशासनाला रुद्राक्ष उत्सव थांबवावा लागला होता.