अमेरिकन खासदार ग्रीन एच-१बी व्हिसा रद्द करण्यासाठी प्रस्ताव मांडणार, काय आहे कारण?

अमेरिकन खासदार मार्जरी टेलर ग्रीन एच-१बी व्हिसा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यासाठी एक प्रस्ताव मांडणार आहे. या प्रस्तावाचा उद्देश केवळ हा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करणे नाही तर, नागरिकत्वाचा मार्ग देखील बंद करणे आहे. एखाद्याचा व्हिसा संपला की, लोकांना घरी परतण्यास भाग पाडले जाईल. हा व्हिसा हिंदुस्थानी व्यावसायिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

याबाबत बोलताना खासदार म्हणाल्या आहेत की, “माझ्या प्रिय अमेरिकन मित्रांनो, मी एक प्रस्ताव सादर करत आहे, ज्यात एच-१बी व्हिसा कार्यक्रम पूर्णपणे संपवण्याचा प्रस्ताव आहे. हा कार्यक्रम दशकांपासून फसवणूक आणि दुरुपयोगाने भरलेला आहे आणि अमेरिकनांच्या नोकऱ्या हिसकावतो आहे.” त्या म्हणाल्या की, हा कार्यक्रम अमेरिकन अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवतो आणि स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवतो.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एच-१बी व्हिसा कार्यक्रमाचे समर्थन केले होते. त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेला जगभरातील प्रतिभावान व्यक्तींना आकर्षित करणे आवश्यक आहे, कारण देशात काही विशिष्ट कौशल्यांची कमतरता आहे.