
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. तणावग्रस्त वातावरणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ‘पाकिस्तान सुपर लीग’ (पीसीएल) स्पर्धा दुबई येथे हलविण्याच्या तयारीत होती आणि त्यांनी अमिराती क्रिकेट मंडळाकडे पीसीएल आयोजनाची ऑफरही केली. मात्र, अमिराती मंडळाने पीसीएल आमच्याकडे नको रे बाबा म्हणत ती ऑफर धुडकावून लावली आहे.
रावळपिंडी स्टेडियमवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने पीएसएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये हलवण्याचे जाहीर केले होते, मात्र अमिराती क्रिकेट बोर्डाकडून या स्पर्धेच्या आयोजनाला मान्यता मिळण्याची शक्यता कमी आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, अमिराती क्रिकेट बोर्डाचे बीसीसीआयशी मजबूत संबंध असून 2021 च्या टी-20 विश्वचषक आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान हिंदुस्थानच्या सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलचेही आयोजन केले आहे. दुबई हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालयदेखील आहे. इतक्या तणावाच्या परिस्थितीत पीएसएलचे आयोजन केल्याने बीसीसीआयशी असलेला सुसंवाद बिघडू शकतो. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पीएसएलच्या सामन्यांना अमिराती बोर्डच नव्हे तर अमिराती प्रशासनाकडूनही मान्यता मिळणे अवघड असल्याचे समोर आले आहे.