23 लाखांत गोल्डन व्हिसाचे वृत्त यूएईने फेटाळले

संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारने 23.30 लाखात गोल्डन व्हिसा सुरू केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यूएई सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. काही निवडक देशांतील नागरिकांसाठी आजीवन गोल्डन व्हिसा देण्याचा दावा सरकारने फेटाळला आहे. गेल्या दोन दिवसात यासंबंधी ज्या बातम्या छापून आल्या आहेत. त्या पूर्णपणे निराधार आणि खोटय़ा आहेत, असे यूएई सरकारने स्पष्ट केले आहे. गोल्डन व्हिसा देण्याचा सरकारचा कोणताही प्लान नाही, असे संयुक्त अरब अमिराती सरकारने म्हटले आहे. हिंदुस्थानी नागरिकांना गोल्डन व्हिसासाठी कमीत कमी 20 लाख दिरहम म्हणजेच जवळपास 4.66 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करावी लागते. परंतु, अवघ्या 23 लाखांत आता ही सुविधा मिळेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने पुढे येऊन हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.