राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच मैत्रिणीची एका क्षुल्लक कारणावरून हत्या केली. पीडित मुलीने आरोपीचा मैत्रीचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणाने हे कृत्य केले. याप्रकरणी सध्या पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
प्रताप नगर पोलीस ठाण्याचे क्षेत्र अधिकारी भरत योगी यांनी या संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. मृत मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी संगणकाचा क्लास घेण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र बराच वेळ झाला ती घरी परतली नाही. त्यामुळे त्या मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
चौकशी दरम्यान झारों की सराई देवरी रेल्वे रुळावर एका मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. दरम्यान पोलिसांनी तात्काळ त्या मुलीच्या कुटुंबीयांकडून मृतदेहाची ओळख पटवून घेतली. यानंतर आरोपीच्या शोधात पोलिसांनी एका शूरवीर सिंग रा. कुंडिवाडा देबारी नामक एका तरुणाला चौकशीसाठी अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने अल्पवयीन मुलीचा खून केल्याचे मान्य केले.
‘मला तिच्याशी मैत्री करायची होती. यासाठी मीच तिला रेल्वे रुळावर बोलावले होते. ती मला भेटायला देखील आली होती. तेव्हा मी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने त्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्याभरात मी तिला ट्रेनसमोर ढकलले आणि तिथून पळून आलो’, अशी माहिती स्वत: आरोपीने पोलिसांना दिली. दरम्यान एका अल्पवयीन मुलीला ट्रेनसमोर ढकलून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.