
ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात विधान भवन परिसर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. या घटनेनंतर विधान भवन परिसरात एंट्रीचे नियम कडक करण्यात आले होते तरीही विधान भवनाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे बनावट लेटरहेड तयार करून तसेच त्यावर अधिकाऱ्यांच्या स्कॅन केलेल्या सह्यांच्या आधारे विधान भवनाचे प्रवेश पास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एमआयडीसीच्या बनावट लेटरहेडवर 50 अधिकाऱ्यांची नावे, हुद्दा, स्कॅन केलेल्या सह्या वापरून विधान भवनाचे प्रवेश पास मिळवण्यात आले, ही गंभीर बाब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर त्याची सीएमओकडून चौकशी करण्यात आली. चौकशीत लक्षात आले की, विधान भवनातील शिपायांनी एमआयडीसीसह मंत्रालयातील इतर विभागांच्या नावानेही अशा प्रकारची बोगस पत्रे बनवली असून पास देण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये आकारतात. विधिमंडळात याचा तपास सुरू असताना काही कर्मचाऱ्यांनी कबुलीदेखील दिली आहे, परंतु अशा दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी मंत्री सामंत यांनी सभापतींकडे केली. त्यावर ही बाब आमच्या निदर्शनास आली असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून अधिवेशन संपण्यापूर्वी कठोर कारवाई केली जाईल, असे सभापती शिंदे यांनी सांगितले.





























































